मनूची गोष्ट
मनुची गोष्ट – मयुरा रोहित खरे
१
प्रिय
सप सोनं ओ सपननी आरती
म्हारा सपनामां आया कुंकूना जोड
बानू आया ओ लाडाले कुंकू चढे
सप सोनं ओ सपननी आरती
बाहेर बायकांची लगबग सुरु, हळद फोडत गाणी सुरु..सगळ्यांची थट्टा मस्करी सुरु. मी इथे खोलीत थोड्या वेळासाठी एकटी बसले. मी आरश्यात स्वतःला न्याहाळत होते. सावळी, रूपाने डावी, सर्वसाधारण मुलगी , आणि आता बोहल्यावर जाणार...................खरच!
मुलगी म्हटलं कि लग्न हीच तिच्या जीवनाची इतिश्री असते. ती शिकते , व्यवहार शिकते, संस्कार होतात तिच्यावर ते फक्त आणि फक्त लग्न करून तिला घरातून दुसऱ्याकडे पाठवण्यासाठी.
म्हारा सपनामां आया हळदीना जोड
बानू आया ओ लाडाले हळदी चढे
सप सोनं ओ सपननी आरती
माझही स्वप्न काही वेगळं नव्हते. चार चौघिंसारखी शिकले लग्नाची स्वप्न पाहिली आणि बाकी चार चौघी सारखं माझंही झाल. रूपाने देखणी नव्हते त्यामुळे बाबांना मला घेवून अक्षरशः घरांचे उंबरठे झिजवावे लागले. किती विनम्र , अगदी लाचार पणा म्हणा न. मला ते अजिबात आवडत नव्हत.
आमची मुलगी किती चांगली, ह्याच वर्णन आपण “आखूड शिंगी बहु दुधी” किंवा ते दारोदार आपल उत्पादन विकायला कसे जातात न सेल्समन तसलच मुलीची वर्णने होतात.
म्हणजे बघा आधी मुंबई पुण्याची मुले , नंतर नाशिक कोल्हापूर , मग नागपूर मग अगदीच बीड नांदेड औरंगाबाद आणि शेवटी धुळे जळगाव अस.
मुंबई पुण्या वाल्यांनी स्वीकारावं म्हणून तुम्ही म्हणाल तर नोकरी करेल नोकरी केलीच पाहिजे आजकाल. तुम्ही म्हणता तर अगदी घरगुती माझी मुलगी. घरकाम उत्तम करते.
तुम्हाला कोण हवी सांगा फक्त. आमच product customer फ्रेंडली आहे.
हे तेंव्हा का खटकत होत ते आता कळत. कुठेतरी माझ्या मनात स्वतंत्र व्यक्तिमत्व दडल होत म्हणून. पत्रकार आजकाल विचारतात तुमच्या आयुष्याची वळणं हा आशीर्वाद झाला का तुम्हाला?
काय माहिती ? कदाचित ते सरळ सरळ आयुष्य आवडल हि असत.
असो.
आधी फोटो, मग पत्रिका मग मुलांनी बघायचं मग कोण्या बहिणीच वाहिनीच आईच बघण राहील आहे म्हणून त्यांनी पुन्हा बघायची. मग पसंती. मग बोलणी किती खर्च करणार, काय काय घालणार? मग सुपारी मग साखरपुडा मग लग्नापर्यंत काही बिनसलं नाही तर लग्न होणार.
असल्या बऱ्याच वराती झाल्या, माझ लग्न ठरलं बाई एकदाचं. दिसायला सावळी कशीही असले तरी ठरलं . आईचे सगळे नवस कामाला आले. परवा पप्पा हिशोब लावत होते, पत्रे, येण्या जाण्याचा खर्च मिळून १०००० तर फक्त लग्न ठरे पर्यंत लागले. मला तर बाई तेंव्हा भीतीच वाटत होती, काय मागतील?, काय नाटकं होतील?, काय माहित.
पण त्यांनी जास्त काही नाही मागितलं. रीतसर हुंडा आणि लग्नाचा खर्च. बास .
मी तर मग नंतर सगळ्या कोवळ्या सोनेरी हिरव्या स्वप्नांमध्येच रममाण झाले. लग्न, संसार, तो नी मी, गुलाबी गुलाबी स्वप्न.
म्हारा सपनामां आया बाशिंगना जोड
बानू आया ओ लाडाले बाशिंग चढे
सप सोनं ओ सपननी आरती
त्याचा फोन येणार होता तर काय मोहरले होते मी. काय बोलू तेच कळेना. फार फार गटपटले होते मी. एकदम कोण्या नवख्या पुरुषाशी कस बोलणार आणि काय बोलणार न?
तरी मी प्रयत्न केले. फोन वर काय बोलू? मला तर काही सुचतच नव्हत. पण बर होत कि तो पण काही बोलत नव्हता जास्त. गप्प गप्पच होता. हा म्हणा, मुलं पण तर बिचकतच असतील न आधी, सगळेच थोडी धीट असतात.
आता मी स्वप्नात रमणार, गुलूगुलू, गुलाबी गोष्टी, करणार होते. आता मला लग्न ठरलेले, तांसोशी काय बोलतात ते कळणार होत. ते मोहरलेले क्षण, स्वप्नाळू पण सगळा सगळा मला एकदाचा अनुभवता येणार होता म्हणून मी फार फार खुश होते.
Comments
Post a Comment